जेलमध्ये गेलो तरी चालेल, पण भारतात येणार , अभिजित दीपकेचा आंदोलनाबाबत मोठा निर्णय

Foto
नवी दिल्ली  : सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके लवकरच अमेरिकेतून भारतात येणार आहे. नीट परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दीपकेने भारतात एका मोठ्या आंदोलनाची रणनीती आखली आहे. भारतात पाऊल ठेवण्यापूर्वी त्याने देशातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने पुण्यातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांना थेट अमेरिकेतून फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी या फोन कॉलमागील गोष्ट स्पष्ट केली. अभिजित दीपकेने ६ जून रोजी भारतात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यापूर्वी त्याने असीम सरोदे यांना मेसेज आणि फोन करून भारतातील सद्यस्थिती जाणून घेतली. मी अभिजितला स्पष्ट सांगितले की, सध्याचे सरकार जर बदल्याच्या भावनेतून कारवाई करणार असेल, तर तू भारतात येण्यापूर्वी विचार केला पाहिजेस. पूर्ण नियोजन असेल तरच भारतात ये. यावर अभिजितने अत्यंत आक्रमक भूमिका घेत, जेलमध्ये टाकले तरीही चालेल, पण आता विद्यार्थ्यांसाठी क्रांती झालीच पाहिजे, असं उत्तर दिल्याचे सरोदे यांनी सांगितले.

गांधीवादी मार्गाने परिवर्तनाचा सल्ला
विद्यार्थ्यांचे दुःख आणि त्यांच्यावरील अन्याय मांडण्यासाठीच कॉक्रोच जनता पार्टी उभी राहिली आहे, असे दीपके यांचे मत आहे. यावर सरोदे यांनी त्यांना प्रक्षोभक भाषणे टाळण्याचा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची साथ न सोडता महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा मोलाचा सल्ला दिला, जो अभिजित दीपके यांनी मान्य केला. या आंदोलनासाठी दीपके यांनी पुण्यातील डॉ. विश्वंभर चौधरी, निखिल वागळे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आणि लडाखचे आंदोलक सोनम वांगचुक यांनाही आमंत्रित केले आहे.

विमानतळावरूनच अटकेची शक्यता का?
अभिजित दीपके हे भारतात येत असले तरी त्यांच्यासमोरील अडचणी कमी नाहीत. दीपके याला पाठिंबा किती आणि कसा मिळतो हे पाहणं सरकारची भूमिका असेल कारण थेट अटक करण्याची घाई सरकार करणार नाही. कदाचित अभिजित दीपके याला विमानतळावरून अटक होऊ शकते, असंही सरोदे म्हणाले.

एक्स अकाऊंट बंद 
यापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत त्यांचे १ कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेले अधिकृत एक्स खाते बंद केले होते. याविरोधात दीपके यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा भडका उडणार?
अभिजीत दीपकेने एक व्हिडिओ पोस्ट करत थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर शांततापूर्ण आणि संविधानाच्या मार्गाने एकत्र येऊन देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवाज उठवण्याचे आवाहन त्याने तरुणांना केले आहे.